National Means Cum-Merit Scholarship Scheme

National Means Cum-Merit Scholarship Scheme

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ कार्यालय, इमारत दुसरा व चौथा मजला, सर्व्हे नं. ८३२ ए, भांबुर्डा, शिवाजी नगर, पुणे- ४११००४Phone No. ०२०-२९७०९६१७विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ.८ वी साठी परीक्षा रविवार, दिनांक २२ डिसेंबर, २०२४

अधिसूचना.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ( NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.inhttps://mscenmms.in

या संकेतस्थळावर दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

सोबत: माहितीपत्रक(अनुराधा ओक) आयुक्त,माहितीपत्रक

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर २०२४

a) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे.

b) विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.

c) विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी.

केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली) २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु.१०००/- (वार्षिक रु.१२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणा-या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन२०२३-२४ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेलाअसावा.)

(d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.•विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

दिनांक ०५/१०/२०२४ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या

https://www.mscepune.in

https://mscenmms.in

या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगीनवरुन Edit करता येईल. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, याची नोंद घ्यावी. सविस्तर माहिती परिषदेच्या

https://www.mscepune.in/

https://mscenmms.in

या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT):- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण- ३५)

२. समाजशास्त्र (एकूण गुण – ३५)

३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील.

या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात. उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

c. गणित २० गुण.

परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली / अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या

https://www.mscepune.in/

https://mscenmms.in

या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉगीनवर परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उपलब्ध होतील. सदर प्रवेशपत्राची छापील प्रत विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची तसेच सदर प्रवेशपत्रातील विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याची सर्व जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाय योजना यांचा विचार करुन बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्रशासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हयानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी ( अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल, जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा रु.१,०००/- ( वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.> इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. ( SC / ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)> सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.

शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ०४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!