विषय मराठी
इयत्ता तिसरी
खालील उताऱ्याचे वाचन करा आणि दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल करा.
एका जंगलात सिंह त्याच्या गुहेमध्ये आरामात झोपला होता. एक उंदीर तिथं आला आणि सिंहाच्या अंगावर चढू लागला . तेवढ्यात, सिंहाने उंदिरदादाला पकडले. उंदराने सिंहाची विनवणी केली आणि म्हणाला ” तुम्ही मला सोडलं तर मी एक दिवस नक्की तुमच्या उपयोगी पडेल .” हे ऐकून सिंह हसू लागला. त्यानी छोट्याशा उंदराला सोडून दिलं. काही दिवसांनी एक शिकारी सिंहाच्या शिकारीसाठी जंगलात आला. त्यांनी सिंहावर जाळे टाकले आणि दुसऱ्या शिकारीच्या शोधात निघून गेला. सिंह गर्जना करून सोडण्यासाठी धावा करू लागला. सिंहाची गर्जना उंदराने ऐकली आणि उंदीर त्याच्या मदतीला धावून आला. उंदराने दातांनी जाळे कापून सिंहाची सुटका केली. सिंहाने आपले प्राण वाचवले म्हणून उंदराचे आभार मानले.
१. गुहेत कोण झोपले होते ?
अ) अस्वल ब) गाय. क) वाघ ड) सिंह
२. सिंहाच्या अंगावर कोण उड्या मारत होता ?
अ) बगळा ब) उंदीर क) माकड ड) कावळा
३. सिंहाला कोणी पकडले?
अ) हत्ती ब) शिकाऱ्याने क) उंदराने ड) माणसाने
४. उंदराने सिंहाचा जीव कसा वाचवला ?
अ) पाणी देऊन ब) शिकाऱ्याला मारून
क) जाळे कापून ड) जाळे टाकून
५. शेवटी सिंहाने कोणाचे आभार मानले?
अ) शिकाऱ्याचे ब) स्वतःचे क) उंदराचे ड) हरणाचे
पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
वर्ग शांत होता. मनुली पटकन उठली. बाईना म्हणाली. “मी गमतीशीर चित्र काढले बाई! अगदी डोंगरातल्या नदीचं, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं.” गमतीशीर? दाखव बरं! बाई म्हणाल्या. मनुलीने पुस्तकात ठेवलेली होतीच. गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतले. “अगं, चित्र दाखवतेस ना ?” बाईंनी विचारले. मनोली वर्गापुढे आली. तिने डाव्या हातात पान धरले होते. बाई म्हणाल्या, “, हे तर पान आहे.” मनुलीने डाव्या हाताच्या तळव्यावर ते पान ठेवले. तळहात किंचित खोलगट केला. पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली,” पाहा बाई, मी डोंगरातून आलेली नदी. पुढे पुढे चाललीय. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ, ओढे तिला येऊन मिळतायत. नदी पुढे पुढे चाललीय. बाई ही नदी शहाणी नदी आहे. सरळ ओळीत चालली आहे. खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते .
६. मनुलीच्या हातात काय होते?
अ) मोरपीस ब) वही क) पान ड) पत्र
७.. पानावरून मनुलीला कशाची माहिती द्यायची होती ?
अ) डोंगराची ब) नदीची क) पानाची ड) झाडाची
८ पानावरील बाजूच्या शिरा म्हणजे काय होते ?
अ) रेषा. ब) छोटे ओहोळ क) छोटी नदी ड) डोंगर
९. नदी कशी चालली आहे?
अ) नागमोडी. ब) सरळ क) हळुवार ड) वेगात
१०. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
अ) सरिता ब) वनिता क) गंगा ड) गोदावरी
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
माकड, ससा आणि कासव हे एकमेकांचे चांगले मित्र होते. या तिघांनीही जंगल सोडून वाळवंटात जायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उंट काकाला सोबत घेऊन वाळवंटात प्रवासाला निघाले. ते चौघेही वाळवंटात थोडे अंतर चालले आणि उंट सोडून तप्त वाळूमध्ये त्यांना धड चालताही येत नव्हते. त्यांना खूप थकलेलं बघून उंट म्हणाला,” तुम्ही माझ्या पाठीवर स्वार व्हा, माझे पाय उंच आणि तळवे इतके मोठे आहेत की ते या तप्त वाळू अडकत नाहीत. म्हणून तर लोक मला ‘वाळवंटातील जहाज’ म्हणतात.” तिघेही उंटाच्या पाठीवर स्वार झाले आणि पुढचा प्रवास करू लागले. पुढे गेल्यावर तिघांनाही तहान लागली . ससा उंटाला म्हणाला, “उंट काका, तुम्हाला नाही तहान लागली का? तुम्ही पण पाणी प्या!” उंट म्हणाला,” मी एकाच वेळी भरपूर पाणी पिऊन घेतो.आणि पोटातल्या पिशवीत साठवतो. अन्नाची चरबी सुद्धा माझ्या पोटात साठवली जाते. यामुळे कित्येक दिवस अन्नाची गरज पडत नाही. “
११. माकड ससा आणि कासव हे एकमेकांचे कोण होते?
अ) शत्रू ब) मित्र क) शेजारी ड) नातेवाईक
१२.वाळवंटातील प्रवासासाठी त्यांना कोणी मदत केली ?
अ) सिंहाने
ब) घोड्याने
क) उंटाने
क) हत्तीने
१३. उंटाला वाळवंटातील काय म्हणून ओळखले जाते?
अ) बस
ब) जहाज
क) विमान
ड) होडी
१४. माकड ससा आणि कासव वाळवंटातून जाताना कोणाच्या पाठीवर बसले?
अ) माकडाच्या
ब) बैलाच्या
क) उंटाच्या
ड) घोड्याच्या
१५. उताऱ्यात आलेल्या ‘मित्र’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
अ) शत्रु
ब) भाऊ
क) सोबती
ड) सखा
१६. ‘पाणी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
अ) नीर
ब) कनक
क) शर
ड) ढग
खाली शब्दकोडे दिले आहेत. विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिलेल्या शब्दकोड्यातून शोधा व लिहा.
१७. कुंभार माती पासून काय घडवतो?
अ) मडके
ब) मुले
क) धातूची भांडी
ड) मुर्ती
१८. एका पाळीव प्राण्याचे नाव जे शब्दकोड्यात आले आहे.
अ) बैल
ब) शेळी क) मेंढी
ड) गाय
१९. जसे पक्षांचा थवा तसे हरणांचा काय असतो?
अ) घोळका ब) टोळी क) कळप ड) तांडा
२०.शब्दकोड्यातील एका फळाचे नाव
अ) आंबा
ब) फणस
क) केळी
ड) टरबूज
२१. जसे गव्हाची ओंबी, तसे मक्याचे काय असते?
अ) घोस
ब) कणीस
क) फळ
ड) शेंग
पुढील चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा…
PICTURE
२२.दिलेले चित्र कशाचे आहे?
अ) जत्रा
ब) उत्सव
क) मेळावा
ड) स्पर्धा
२३. चित्रातील पाळण्याचा आकार कसा आहे?
अ) त्रिकोणी
ब) चौकोनी
क) गोलाकार
ड) आयताकार
२४. जत्रा कुठे भरली आहे?
अ) शहरात
ब) गावा
क) नदीकाठी
ड) जंगलात
२५. जत्रेला आलेली मुले कशात बसली आहेत?
अ) होडीत
ब) झोक्यावर
क) पाळण्यात
ड) घरात
२६.चित्रात नदीकाठी दिसत असलेली मुले नदीत काय सोडत आहे?
अ) कागदी होड्या
ब) फुले
क) पाने
ड) नारळ
पुढील चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
२७. हे चित्र कशाचे आहे?
अ) चंद्राचे
ब) सूर्याचे
क) पृथ्वीचे
ड) चेंडूचे
२८.सूर्याच्या खाली काय दिसत आहे ?
अ) चंद्र
ब) पाणी
क) ढग
ड) जमीन
२९. सूर्या पासून आपल्याला काय मिळते?
अ) प्रकाश
ब) अंधार
क) सावली
ड) पाणी
३०. सूर्याचा समानार्थी शब्द सांगा ?
अ) मयंक
ब) इंदू
क) नीर
ड) दिनकर
३१. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो?
अ) पूर्व
ब) दक्षिण
क) पश्चिम
ड) उत्तर
खाली दिलेले कॅलेंडर पहा आणि दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल करा.
३२.नोव्हेंबर महिन्याचे एकूण दिवस किती आहेत?
अ) 28
ब) 31
क) 30
ड) 29
३३.नोव्हेंबर महिन्यात एक तारखेला कोणता सणाचा दिवस आहे? अ) गुरुनानक जयंती
ब) बलिप्रतिपदा
क) लक्ष्मीपूजन
ड) नाताळ
३४. नोव्हेंबर महिन्यात एकूण किती रविवार आहेत?
अ) 4
ब)5
क) 3
ड) 6
३५. गुरुनानक जयंती कोणत्या तारखेस आहे?
अ) 13
ब) 15
क) 25
ड) 28
३६.नोव्हेंबर महिन्यात शनिवार किती वेळा आला आहे?
अ) 3 वेळा
ब) 5 वेळा
क) 6 वेळा
ड) 4 वेळा
खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल करा
भारत हा सणांचा देश आहे. येथे वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. हा दिव्यांचा सण आहे. हा सण भारतात दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांची रांग. या दिवशी प्रत्येक घर दिव्यांनी उजळले जाते. रावणाचा वध करून १४ वर्षानंतर कार्तिक महिन्याच्या अमावस्येला राजा राम आयोध्येत परतले तो दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जातो. पावसाळ्याच्या आगमनामुळे आजूबाजूला घाण, डास, कोळी आदींचा प्रादुर्भाव निर्माण होतो. त्यामुळे या निमित्ताने घराची साफसफाई व रंगरंगोटी केली जाते. ज्यामुळे किटकांचा नाश होतो.
३७.भारताला कशाचा देश म्हणून संबोधले आहे?
अ) लोकांचा
ब) सणांचा
क) रामाचा
ड) रंगांचा
३८. हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण कोणता?
अ) दसरा
ब) दिवाळी
क) होळी
ड) रंगपंचमी
३९. दिवाळी सणाला कशाच्या रांगा लावल्या जातात?
अ) मुलांच्या
ब) दिव्यांच्या
क) वाहनांच्या
ड) लोकांच्या
४०. दिवाळीनिमित्त घरोघरी कुठले काम केले जात नाही ?
अ)साफसफाई व रंगरंगोटी
ब) शेतीकाम.
क) रांगोळी काढणे.
ड) फराळ बनविणे.
४१.उताऱ्यात कोणत्या राजाचा उल्लेख आला आहे?
अ) भरत
ब) राम
क) अशोक
ड) अकबर
खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व त्यावरील आधारित प्रश्नांच्या अचूक उत्तराच्या पर्यायाला गोल करा.
४२. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कोणत्या मंडळाने आयोजित केली आहे?
अ) क्रीडा व सांस्कृतिक मंडळ
ब) विदयार्थी मिञ मंडळ
क) कलाप्रेमी मंडळ
ड) भाषा प्रेमी मंडळ
४३. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कुठल्या वयोगटासाठी आयोजित केली आहे?
अ) 15 ते 20
ब) 20 ते 25
क) 8 ते 15
ड) 6 ते 8
४४. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कोणत्या जिल्ह्यासाठी आयोजित केली आहे?
अ) नाशिक
ब) औरंगाबाद
क) नागपूर
ड) पुणे
४५. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेमुळे कोणता मुख्य फायदा होईल?
अ) अक्षर सुंदर होईल
ब) सुदंर चित्रं काढता येईल
क) वेळ वाया जाईल
ड) वाचन चांगले करता येईल.
खालील नातेसंबंधाचे शब्दकोडे बघा त्यामध्ये रिकाम्या जागी योग्य अक्षर टाकून शब्द तयार करा व विचारलेल्या प्रश्नाच्या योग्य उत्तराला गोल करा.
अ) पणजोबा
ब) खापर पणजोबा
क) मोठे आजोबा
ड) आजोबा
४८. मोठ्या भावासाठी शब्दकोड्यात कोणता शब्द आला आहे ?
अ) भाऊ
ब) दादा
क) नाना
ड) काका
४९. चुलत्याच्या किंवा काकाच्या मुलाला काय म्हणतात?
अ) मावसभाऊ
ब) मामेभाऊ
क) आतेभाऊ
ड) चुलतभाऊ
५०. आईच्या बहिणीला काय म्हणतात ?
अ) आजी
ब) मावशी
क) आत्या
ड) काकी
खालील चित्राचे निरीक्षण करून चित्रावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल करा.
५१. पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी कोणती काम करत आहे?
अ) झाडे लावणे
ब) शेती काम
क) घरकाम
ड) बागकाम
५२. झाडांना पाणी देण्याचे काम कोण करत आहे?
अ) विद्यार्थी
ब) विद्यार्थिनी.
क) शिक्षक
ड) शिक्षिका
५३. वृक्षारोपणाचा कार्यक्रम कोणत्या ठिकाणी सुरू आहे?
अ) शाळेत
ब) परसबागेत
क) माळरानावर
ड) शेतात
५४. सूचना व मार्गदर्शन कोण करत आहे?
अ) वर्गमंत्री
ब) शिक्षिका
क) विद्यार्थी
ड) शिक्षक
५५. पर्यावरणाचे रक्षण करणे हे कोणाचे कर्तव्य आहे?
अ) मानवाचे
ब) प्राण्यांचे
क) पक्षांचे
ड) वनस्पतींचे
आई आणि मुलगी यांच्यातील संवाद वाचा व त्यावरील दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराला गोल करा.
मुलगी: आई, आज आमच्या शिक्षकांनी एक चांगली गोष्ट सांगितली.
आई: कोणती गोष्ट सांगितली गं?
मुलगी : संयमाचे फळ गोड असते.
आई : मुलगी, तू गोष्ट लक्षपूर्वक ऐकलीस का?
मुलगी : हो! आई.
आई : मुलगी, त्यातून काय शिकलीस?
मुलगी : आपण घाईगडबडीत कोणतेही काम करू नये. त्यामुळे कामात चुका होतात, वेळ वाया जातो, आपले श्रम खर्च होतात. केवळ विचारपूर्वक केलेल्या कामामुळे यश मिळते. वगैरे
आईः खूप छान! वेळप्रसंगी संयम बाळगणे हे चांगल्या माणसाचे लक्षण आहे.
५६. हा संवाद कोणामध्ये झाला आहे ?
अ) आई आणि मुलगा
ब) आईं आणि मुलगी
क) आजी आणि मुलगी
ड) वडिल आणि मुलगी
५७. गोष्टीचे नाव(शीर्षक) काय होते?
अ) संयमाचे फळ गोड असते
ब) संयमाचे फळ आंबट असते.
क) संयम चांगली गोष्ट आहे.
ड) संयम सोडू नये.
५८. घाई गडबडीत काम केल्यामुळे काय होते?
अ) कामात चुका होतात
ब) काम चांगले होते
क) काम वेळेत होते
ड) आणखी काम करता येते.
५९. वर्गात गोष्ट कोणी सांगितली?
अ) विद्यार्थ्यांनी
ब) विद्यार्थिनींनी.
क) शिक्षकाने.
ड) शिक्षिकेने.
६०. विचारपूर्वक काम केल्यामुळे कोणता फायदा होतो ?
अ) कामात चुका होतात
ब) आपण विचार करत बसतो
क) कामात यश मिळते
ड) काम होत नाही.
दिलेली कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
ढगांच्या खिडकीतून
किरणांच्या झडी
पक्ष्यांच्या पंखावर
सोनेरी खडी
पानांच्या चोचीत
चंदेरी चारा
फांदयांतून वाहे
रूपेरी झरा
धरणीशी जुळल्या
प्रकाशाच्या तारा
६१. किरण कोठून येत आहेत
अ. घराच्या खिडकीतून
ब. ढगांच्या खिडकीतून
क. सोनेरी खिडकीतून
ड. किरणांच्या खिडकीतून
62.पक्षांच्या पंखावरील खडीचा रंग कसा आहे?
अ. चंदेरी
ब. पानेरी
क. सोनेरी
ड. रुपेरी
६३ . गटात न बसणाऱ्या पर्यायास गोल कर.
अ. पक्ष्यांचे पंख
ब. पानांच्या चोची
क. प्रकाशाच्या धारा
ड. चंदेरी चारा
६४. झरा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
अ. नदी
ब. पाणी
क. निर्झर
ड. ओढा.
६५.कवितेत आलेली नाही अशी यमकाची जोडी कोणती?
अ. तारा – चारा
ब. खडी – झडी
क. तारा झरा
ड. वाहे – आहे
६६. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
अ. नक्षी
ब. खग
क. ढग
ड. पक्ष
दिलेली कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
भिर भिर भिर रे!
इकडे-तिकडे कोण रे !
उठू चला तर भल्या पहाटे
फुलांत भरले मधाचे साठे
इथे उड्डू का तिथे उडू
मौज-मजेचा नाच करू
थकले-भागले फुलपाखरू
अहाहा! पानांचा झोका जरा विसावू!
६७.मध कोणी साठवला आहे?
अ. फुलांनी
ब. पानांनी
क. झाडाने
ड. फुलपाखराने
६८. थकलेले फुलपाखरू कोठे बसले आहे?
अ. फुलावर ब. फांदीवर
क. मधावर
ड. पानावर
६९.फुलपाखराच्या उडण्याला कवितेत काय म्हटले आहे?
अ. बागडणे
ब. चालणे
क. बसणे
ड. भिरभिरणे.
७०.फुलपाखराने केव्हा उठायचे ठरवले आहे?
अ. सकाळी
ब. पहाटे
क. दिवसा
ड. रात्री
७१. विसावणे या शब्दाचा अर्थ कोणता?
अ. थांबणे
ब. विश्रांती घेणे
क. विसरणे
ड. विचार
दिलेली कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
आज पाहुणे येणार घरा
स्वागताची तयारी करा
चार भिंतीच्या घरकुलात
केवळ दोन पिलांचा किलबिलाट
आजी-आजोबा, काका-काकी
मामा-मामी, आत्या- मावशी
सारे मिळूनी जेव्हा येती
पुरण पोळी, खीर, बासुंदी,
गोलाकार पंगत बसती
रंगतात गोड-गोड गप्पा-गोष्टी
आनंदाला मग येते भरती
७२. कवितेत दोन पिले असे कोणास म्हटले असावे असे तुला वाटते?
अ. आई-बाबांना
ब. घरातील मुलांना
क. आजी-आजोबांना
ड. मामा-मामीला
७३.पाहुण्यांसाठी कोणता पदार्थ केलेला नाही?
अ. पुरण-पोळी
ब. पुरी
क. खीर
ड. बासुंदी
७४.सर्वजण मिळून जेवायला कसे बसतात?
अ. गोलाकार पंगतीत
ब. स्वयंपाक घरात
क. समोरासमोर
ड. एका रांगेत
७५. त्या दिवशी घरात एकूण किती माणसे असतील असे तुला वाटते?
अ. १०
ब. ८
क. ६
ड. १२
७६. पाहुण्यांसाठी केलेले पदार्थ कसे होते?
अ. तिखट
ब. गोड
क. आंबट
ड. खारट
दिलेली कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
तळ्यात उगवली कमळाची कळी
मिटलेल्या पाकळ्या रुसलीच मुळी
एवढ्यात आला भिरभिर भुंगा
कळीभोवती घातला पिंगा
नाचून नाचून केला दंगा
गरगर आली वाऱ्याची गिरकी
कळीच्या गालावर मारली टिचकी
मग आले किरण कोवळे
कळीभोवती बांधले उबदार झुले
कळीची तेव्हा कुठे खुलली कळी
झोक्यावर बसून झुलू लागली
एक एक पाकळी लागली
७७.कमळाची कळी कोठे उगवली आहे?
अ. मळ्यात
ब. खळ्यात
क. तळ्यात
ड. पानावर
७८. पाकळ्या मिटलेली कळी कवीला कशी दिसत आहे?
अ. दुःखी झालेली
ब. झोपी गेलेली
क. रुसलेली
ड. मिटलेली
७९.कळीला उमलण्यासाठी मदत करायला कोण आले नव्हते?
अ. वारा
ब. भ्रमर
क. सूर्यकिरण
ड. झोका
८०. कळीच्या गालावर टिचकी कोणी मारली?
अ. भुंग्या
ब. वाऱ्याने
क. पाकळीने
ड. फुला
८१. कवितेत खालीलपैकी कोणता शब्द आलेला नाही?
अ. भिरभिर
ब. गरगर
क. सरसर
ड. गालावर
दिलेली गोष्ट वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
मुसळधार पावसात कावळ्याचे शेणाचे घरटे वाहून गेले. चिमणीचे मेणाचे घरटे मात्र तसेच राहिले. मग कावळा आला चिऊताईकडे. चिऊताईने कावळ्याला तिच्या घरट्यात राहायला जागा दिली.
पावसाळा संपला. कावळ्याने चिमणीचे आभार मानले. आणि तो जंगलात उडून गेला. त्यांने पुन्हा स्वतःसाठी शेणाचे घरटे बांधले.हळूहळू उन्हाचा ताप अधिकच वाढला. त्यामुळे चिमणीचे मेणाचे घरटे मात्र वितळून गेले. चिमणीला फार दुःख झाले. कावळ्याला हे समजले. तो चिमणीकडे गेला आणि म्हणाला, “चिऊताई, चल माझ्या घरट्यात. तिथे आपण दोघे आनंदाने राहूया. आणि पुन्हा आता शेणा-मेणाचे घरटे नाही हं बांधायचे आपण! पावसाळा सुरू होण्याआधी काड्या, गवत, कापूस वेचून त्यापासून उंच झाडावर घरटे बनवूया.”. चिमणीला कावळ्याची ही कल्पना ऐकून फार आनंद झाला.
८२. पावसात कोणाचे घरटे वाहून गेले?
अ. चिमणीचे
ब. कावळ्याचे
क. माणसाचे
ड. गवताचे
८३. कावळ्याने चिमणीचे उपकार कसे फेडले?
अ. तिला नवीन घरटे बांधून देऊन
ब.तिला आपल्या घरट्यात राहण्यासाठी जागा देऊन
क. तिच्या घरट्यात राहिल्याबद्दल आभार मानून
ड.स्वतःसाठी शेणाचे घरटे बांधून
८४. गवत, काड्यांपासून घरटे बनवायचे असे चिमणी कावळ्याने का ठरवले?
अ. पावसाळ्यात ते वाहून जाते म्हणून.
ब.उन्हाळ्यात ते वितळते म्हणून.
क. दोन्ही ऋतुत ते टिकून राहू शकते म्हणून
ड. ते उबदार असते म्हणून
८५. दुःख या शब्दाचा गोष्टीत आलेला विरुद्धार्थी शब्द कोणता?
अ. समाधान
ब. आनंद
क. ताप
ड. सुख
८६. ताप हा शब्द गोष्टीत कोणत्या अर्थाने आलेला आहे?
अ. तीव्रता
ब. त्रास
क. व्याप
ड. तक्रार
दिलेली गोष्ट वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
आज ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्हाला शाळेतून एकेक रोपटे दिले गेले. प्रत्येकाने किमान एक झाड लावायचे व ते चांगले वाढेपर्यंत त्याची काळजी घ्यायची. असे आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला सांगितले. व माझी बहीण मिनूने आमच्या घरासमोरील मोकळ्या जागेत आम्हाला दिलेली रोपटी लावली. आम्ही वेळच्यावेळी त्यांना खतपाणी देऊन त्यांचे संगोपन करू लागलो. चार महिने उलटून गेले होते. मिनूचे रोपटे गर्द हिरव्या पानांनी बहरले होते. मी लावलेले रोपटे मात्र तेवढेच होते. मी बाबांना तक्रारीच्या सुरात म्हणालो, “इतकी काळजी घेऊनही माझे रोपटे का बरे वाढत नाही?” बाबा म्हणाले, “अरे, ही बांबू नावाची वनस्पती आहे. सुरुवातीला
याची मुळे वाढून जमिनीत खोलवर पसरतात आणि काही वर्षानंतर जमिनीवरचा खोडाचा भाग जोमाने वाढू लागतो.” हे ऐकूण मी मनात म्हणालो, “म्हणजे माझी मेहनत वाया नाही गेली तर!”
८७. मिनू च्या भावाला शाळेतून कशाचे रोपटे मिळाले होते?
अ. केळीचे
ब. कर्दळीचे
क. बांबूचे
ड. नारळाचे
८८. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो?
अ. ५ जून २०२४
ब. ५ जुलै
क. ५ जून
ड. ५ जून २०२३
८९. सुरुवातीला बांबू या वनस्पतीच्या कोणत्या भागाची वाढ अधिक जोमाने होते?
अ. खोडाची
ब. मुलांची
क. पानांची
ड. फुलांची
९०. मुलांनी त्यांना दिलेली रोपटी कोठे लावली?
अ. शाळेच्या अंगणात
ब.घरासमोरील मोकळ्या जागेत
क. घरामागील मोकळ्या जागेत
ड. घराच्या बाजूला
९१. या उताऱ्यात वनस्पतींच्या कोणत्या अवयवाचा उल्लेख आलेला नाही?
अ. पान
ब. खोड
क. मूळ
ड. फळ
सूचना फलकावर दिलेली सूचना वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
सूचनाफलक
दिनांक १७/१२/२०२४
| सर्व पालकांना सुचित करण्यात येते की, शालेय क्रीडा स्पर्धांना आरंभ होत असल्यामुळे दिनांक १८ / १२ / २०२४ पासून दिनांक २४ / १२ / २०२४ पर्यंत शाळेच्या वेळेत पुढील
प्रमाणे बदल होईल. याची नोंद घ्यावी.
इयत्ता सहावी ते आठवी ७.०० ते १०.००
इयत्ता पहिली ते पाचवी १२.०० ते ३.००
बालवर्ग.
९२ .
१०.०० ते १२.००
शाळेच्या वेळेत का बदल करण्यात येणार आहे?
अ. शाळेत क्रीडा स्पर्धा होणार असल्यामुळे.
ब. शाळेत क्रीडा स्पर्धा होणार नसल्यामुळे.
क. शाळेत परीक्षा असल्यामुळे.
ड. शाळेत कार्यक्रम असल्यामुळे.
९३. सूचना फलकावरील सूचना कोणासाठी आहे?
अ. शिक्षकांसाठी
ब. शिपायांसाठी
क. पालकांसाठी
ड. मुख्याध्यापकांसाठी
९४. शालेय क्रीडा स्पर्धा किती दिवस चालणार आहेत?
अ. १७
ब. १८
क. २४
ड. ७
९५. सकाळ सत्रात कोणकोणते वर्ग भरणार आहेत?
अ. बालवर्ग
ब. इयत्ता सहा ते आठ
क. इयत्ता एक ते पाच
ड. इयत्ता एक ते पाच व बालवर्ग
९६. आरंभ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
अ. शेवट
ब. सुरुवात
क. नंतर
ड. आधी
दिलेली बातमी वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
दैनिक वार्तापत्र ज्ञानदीप शाळेत पालक बनले शिक्षक (कर्जत) दिनांक ६/०९/०२३५ सप्टेंबर रोजी ज्ञानदीप शाळेत अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. पालकांनी शिक्षकाची भूमिका साकारत शाळेतील शिक्षकांप्रती त्यांच्या मनात असलेला आदर व्यक्त केला. संपूर्ण दिवस शालेय कामकाज व अध्यापनाचे कार्य पार पाडले. स्वतःच्या आवडीचा विषय शिकवायला मिळाल्याचा आनंद पालकांनी व्यक्त केला. मुख्याध्यापक,
शिक्षक, शिपाई, सफाई कामगार या सर्व भूमिका पार पाडताना एकमेकांत समन्वय व सहकार्याची भूमिका महत्त्वाची असते याची जाणीव झाली असे एका पालकांनी आपल्या मनोगतात सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शितल पुरी यांनी पालकांनी शाळेत हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल पालकांचे आभार मानले.
९७. बातमी कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे?
अ. कर्जत वार्तापत्र
ब. दैनिक वार्तापत्र
क. शिक्षक वार्तापत्र
ड. शालेय वार्तापत्र
९८. बातमी किती तारखेला प्रसिद्ध झाली आहे?
अ. ५ सप्टेंबर
ब. ४ सप्टेंबर
क. ६ सप्टेंबर
ड. ५ डिसेंबर
९९. पालकांचे आभार कोणी मानले?
अ. शिक्षकांनी
ब. मुख्याध्यापकांनी
क. शिपायांनी
ड. पालकांनी
१००. पालकांच्या कृतीतून कोणती भावना व्यक्त झाली ?
अ. शिक्षकांविषयी असलेला आदर
ब. बालकांविषयी असलेला आदर
क. शिक्षक दिनाप्रती असलेला आदर
ड. शिकवण्याविषयी असणारा आदर
१०१. अनोखा या शब्दाचा अर्थ कोणता?
अ. नवखा
ब. नवीन
क. आगळावेगळा
ड. चांगला
शेंगदाणा चिक्की
साहित्य: १ कप शेंगदाणे, १५० ग्रॅम गुळ, वेलचीपूड
कृती: सर्वप्रथम एक कप शेंगदाणे मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या. थंड झाल्यावर हलक्या हाताने रगडा. सालीपासून वेगळे केलेले शेंगदाणे खलबत्त्यात किंवा मिक्सरवर ओबडधोबड कुटून घ्या. कढईत दीडशे ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घालून त्यात दोन चमचे पाणी घाला. मंद आचेवर गुळाचा पाक तयार करून घ्या. एका पाण्याच्या वाटीत थोडासा पाक टाकून त्याची ठिसूळ गोळी बनते का हे तपासत रहा. ठिसूळ गोळी तयार झाल्यास पाक तयार आहे असे समजावे. पाकात कुटलेले शेंगदाणे मिसळून घ्या. वेलचीपूड घाला. हलकेसे गरम असतानाच तेल किंवा तूपाचा हात लावलेल्या ताटलीच्या पृष्ठभागावर हे मिश्रण लाटण्याने व्यवस्थित पसरून घ्या. सुरी किंवा चमच्याने चौकोन पाडा. थंड झाल्यानंतर चौकोनी तुकडे एकमेकांपासून वेगळे करा.
१०२. पाककृती म्हणजे काय?
अ. पाकाची कृती
ब.चिक्की
क. पदार्थ बनविण्याची कृती
ड. शिजवण्याची कृती
१०३.पाक तयार झाला आहे हे कशावरून समजते?
अ. ठिसूळ गोळी बनल्यास
ब. गुळ पाण्यात विरघळल्यास
क. गुड वितळल्यास
ड. गुळ चांगला शिजल्यावर
१०४. ताटलीच्या पृष्ठभागावर तेल किंवा तुपाचा हात का लावला जात असेल?
अ. चिक्की चांगली होण्यासाठी
ब. खमंग सुगंध येण्यासाठी
क.मिश्रण ताटलीच्या पृष्ठभागाला चिटकू नये म्हणून
ड. मिश्रण पातळ होण्यासाठी
१०५.चिक्की तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागत नाही?
अ. मीठ
ब. वेलचीपूड
क. शेंगदाणे
ड. गुळ
१०६.वरील प्रमाणानुसार दोन कप शेंगदाण्याची चिक्की बनविण्यासाठी किती गूळ लागेल?
अ. २०० ग्रॅम
ब. ५०० ग्रॅम
क. अर्धा किलो
ड. ३०० ग्रॅम
दिलेली जाहिरात वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
१०७.जाहिरातीतील दुकानाचे नाव काय?
अ. आमचे घर ब. खेळ-घर
क. दुकान नं. ०३
ड. वेगव
१०८.जाहिरातीमध्ये वर्णन केलेली खेळणी कशी नाहीत?
अ. देशी बनावटीची
ब. उत्तम
क. कृत्रिम रंगातील
ड. टिकाऊ
१०९.जाहिरातीत आलेली विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती?
अ. देशी बनावट
ब. देशी-विदेशी
क. खरेदी-विक्री
ड. उत्तम दर्जा
११०. दुकान या दिवशी बंद असेल?
अ. रविवारी
ब. सुट्टीच्या दिवशी
क. शनिवारी
ड. आज
१११.दोन वर्षांच्या बाळासाठी खुळखुळा विकत घ्यायचा आहे; तर या दुकानात मिळेल का?
अ. होय
ब. नाही
क. माहीत नाही
ड. दुसऱ्या दुकानात
दिलेली रोजनिशी वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
आज मी खूप दिवसांनी खेळाच्या मैदानावर गेलो. माझ्या मित्रांनी मला पाहिल्यावर अत्यानंदाने मिठीच मारली. मोकळ्या वातावरणात आल्याने मला माझ्या आजारपणाचा विसर पडला. मन प्रफुल्लित झाले. मला झालेल्या अपघाताविषयी माझ्या मित्रांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांनी मला मागील महिनाभरात शाळेत, वर्गात घडलेल्या घटना, प्रसंग आणि गमती-जमती सांगितल्या. हे ऐकल्यानंतर काही काळ मी शाळेपासून दूर आहे असे मला वाटलेच नाही. शाळेच्या महिनाभराच्या आठवणींचे गाठोडे घेऊन मी घरी परतलो.
११२.रोजनिशीत लिहिले गेलेले अनुभव कसे असतात?
अ. रोज घडलेले
ब. महिनाभरात घडलेले
क. आताच घडलेले
ड. उद्या घेतले जाणारे
११३.शाळेपासून महिनाभर दूर आहे असे मला वाटलेच नाही. असे मुलाने का म्हटले आहे?
अ. कारण तो नियमित शाळेत जात होता.
ब. कारण तो नियमित शाळेत जात नव्हता.
क. कारण त्याचा अपघात झाला होता..
ड. कारण त्याच्या मित्रांनी त्याला शाळेतील सर्व घटना, प्रसंग सांगितले होते.
११४.पुढीलपैकी कोणता शब्द अ प्रत्यय जोडून तयार झालेला नाही?
अ. अपमान
ब. अनियमित
क. अनित्य
ड. असहकार
११५. मुलगा महिनाभर शाळेत का गेला नाही?
अ.कारण त्याला शाळेत जायला आवडत नाही.
ब. कारण त्याला शाळेत जायचा कंटाळा येतो.
क.कारण त्याचा अपघात झाला होता.
ड.कारण त्याला अभ्यास करायला आवडत नाही.
११६.मुलाला मैदानात पाहून त्याच्या मित्रांना काय वाटले?
अ. आश्चर्य ब. आनंद
क. दुःख
ड. वाईट
दिलेली रोजनिशी वाचा आणि प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरे द्या.
मिनी : देतोयंस की नाही बोल.
दादा नाहीच देणार! काय करशील?
मिनी : बाबा, इकडे या. दादा बघा काय करतोय?
बाबा : काय करतोय गं तो?
मिनी : तो, ना…. गेम खेळतोय.
दादा : बाबा, हे पहा ठेवला. आता अभ्यास करतोय हं मी! मिने,
चुगलखोर कुठची! सांगू का बाबांना खरे काय ते?” मिनी : मी तर काहीच केले नाही. काय सांगशील?
दादा : तुला कार्टून पहायचे आहे म्हणून! माझी तक्रार केलीस ना !
११७.संवादातील भावंडांचे भांडण कोणत्या वस्तूसाठी सुरू आहे?
अ. टि.व्ही
ब. मोबाईल
क. खेळणी
ड. खाऊ
११८.संवादात पुढीलपैकी कोणता इंग्रजी शब्द आलेला नाही?
अ. गेम
ब. कार्टून
क. तक्रार
ड. मोबाईल
११९.पुढीलपैकी कोणता खेळ घरात व घराबाहेरही खेळता येतो?
अ. लगोरी
ब. चेंडू – फळी
क. सापशीडी
ड. दोर उडी
१२०. केवळ दोन जण खेळू शकतात असा खेळ कोणता?
अ. बुद्धिबळ
ब. खो-खो
क. कबड्डी
ड. लगो
१२१. काय करतोय ग तो? हे वाक्य पुढीलपैकी कोणते आहे?
अ. उद्गारार्थी
ब. आश्चर्य व्यक्त करणा
क. दुःख व्यक्त करणारे
ड. प्रश्नार्थी
प्रश्न-पुढील गोष्ट वाचा व त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ओळखून पर्यायाला गोल करा.
एकदा एका रहदारीच्या रस्त्यावर वृद्ध आजीला रस्ता ओलांडता येईना. वार्धक्यामुळे आजीबाई ची पुढे जाण्याची हिंमतच होत नव्हती. त्याच रस्त्यावरून रोहन व त्याच्या मित्रांचा घोळका चालला होता. तो आजीकडे पाहून आजीची थट्टा मस्करी करू लागला. आजीबाईचा चेहरा गोरा मोरा झाला . तेथून ईश्वरी नावाची मुलगी चालली होती. तिने हे दृश्य पाहिले. तिला आजीबाईंची दया आली. तिने आजीच्या हाताला धरून रस्ता ओलांडण्यास मदत केली आज आपला थरथरता हात ईश्वरी च्या डोक्यावर ठेवला व आशीर्वाद दिला. आजीला मदत करून आपण निखळ आनंद मिळवला असे तिला मनोमन वाटू लागले. छोट्या ईश्वरीच्या या कृतीने रस्त्यावरील मुलांनी शरमेने मान खाली घातली.
१२२ .रस्ता ओलांडायला कोणाला जमत नव्हते ?
अ) लहान मुलगी
आजोबा
क) आजीबाई
ड) लहान मुलगा
१२३.आजीला रस्ता ओलांडायला कोणी मदत केली ?
अ) रोहन
ब) ईश्वरी
क) रोहनचा मित्र
ड) कोणीच नाही
१२४. आजीबाईंची थट्टामस्करी मस्करी होत असताना ईश्वरीने कोणती कृती केली ?
अ) तीही थट्टा मस्करी करू लागली
ब) ती हे दृश्य पाहतच राहिली
क) ती पुढे आली व तिने आजीबाईना स्वतः मदत केली.
ड) थट्टा करणाऱ्या घोळक्या बरोबर ती भांडण करू लागली
१२५. ईश्वरी समाधानी का झाली ?
अ) आजीबाईंची थट्टा मस्करी करण्याने
ब) आजी बाईंना मदत न करता निघून गेल्याने
क) आजीबाईंची थट्टा करणाऱ्या घोळक्याबरोबर भांडण केल्याने
ड) आजीने आशीर्वाद दिल्यामुळे
१२६. मुलांनी शरमेने मान खाली घातली. अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
अ) आनंद होणे
ब) लाज वाटणे
क) दुःख होणे
ड) प्रसन्न वाटणे
प्रश्न- पुढील गोष्ट वाचा व त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
समीरला आईने पैसे देत दुकानातून पिशवी आणायला लावली पैसे हातात घेतले नंतर समीर आईला म्हणाला आई यातून उरलेला एक रुपया मी घेऊ का? आई सहजच हो म्हणाली याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली समीरला खात्री झाली की आपण कुठलेही काम केले की पैसे मिळतात या समजूतीमुळे त्याला इतर कोणीही काम सांगितले तरी तो पैसे मागू लागला आईला ही गोष्ट समजली तेव्हा तिने त्याला समजावून सांगितले आई बाबा इतर नातेवाईक खूप कष्ट करतात पण त्याचा मोबदला किंवा पैसे मागत नाहीत हे ऐकल्यावर समीरला त्याची चूक लक्षात आली तो रडू लागला आणि तो आईच्या कुशीत जाऊन बसला.
१२७.आईने रोहनला कोणते काम सांगितले ?
अ) कपडे व्यवस्थित ठेवण्याचे.
ब) पेन आणण्याचे.
क) साखर आणण्याचे.
ड) दुधाची पिशवी आणण्याचे.
१२८. समीरने आईकडे कशाची मागणी केली ?
अ) खाऊची
ब) कपड्यांची
क) उरलेल्या पैश्यांची
ड) ज्यादा पैश्यांची
१२९. समीरची कोणती सवय बनली ?
अ )इतरांचे काम न ऐकण्याची.
ब) कामाच्या मोबदल्यात इतरांकडून पैसे घ्यायची.
क) इतरांना सतत काहीतरी द्यायची.
ड) काम सांगितले म्हणून राग धरण्याची.
१३०. पुनरावृत्ती या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
अ) एखादी गोष्ट एकदाच घडणे
ब) एखाद्या एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडणे
क) एखादी गोष्ट कधीतरी घडणे
ड) एखादी गोष्ट न घडणे
१३१. समीर का रडू लागला?
अ) समीरला त्याची चूक समजल्यामुळे त्याला वाईट वाटले
ब) आई विषयी त्याच्या मनात राग होता म्हणून
क) त्याला इतर नातेवाईक ओरडले म्हणून
ड) त्याला पैसे दिले नाहीत म्हणून
प्रश्न- पुढील गोष्ट वाचा व त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
अंघोळीचं गरम पाणी कोमट करण्यासाठी बादलीभर थंड पाणी घेऊन येण्यास गुरुने शिष्याला
सांगितले .आदेशाप्रमाणे शिष्य पाणी घेऊन आला हवं तेवढं पाणी घंघाळात घातलं नि बाकीचं फेकून दिल हा प्रकार पाहून गुरु म्हणाले, “बाळ, पाण्याचा असा अपव्यय करण्याचा तुला काय अधिकार ? ज्या झाडांमुळे आपल्याला हे पाणी मिळतं त्यांना दिलं असतंस तर फार बरं झालं असतं
“1
त्या क्षणी शिष्याला गुरुच्या शिकवणीचं अंतिम ज्ञान झालं. आपण निसर्गाचे रक्षण केलं तरच तो आपलं रक्षण करु शकेल.
१३२. गुरुने शिष्याला केवढे पाणी आणण्यास सांगितले?
अ) घागर भर
ब) बादलीभर
क) तांब्याभर
ड) दोन बादल्या
१३३. शिष्याने उरलेल्या पाण्याचे काय केले ?
अ) पाणी तसेच ठेवले
ब) पाणी झाडांना घातले
क) पाणी फेकून दिले
ड) पाणी घराकडे नेले
१३४. गुरु शिष्याला कोणता अधिकार नसल्याचे सांगितले ?
अ) पाणी आणण्याचा
ब) पाणी वापरण्याचा
क) पाणी पिण्याचा
ड) पाण्याचा अपव्यय करण्याचा
१३५.गुरुने उरलेल्या पाण्याचा वापर कशासाठी करण्यास सांगितले आहे ?
अ)फेकून देण्यासाठी.
ब) तसेच ठेवण्यासाठी.
क) झाडाला घालण्यासाठी.
ड) वाया
घालवण्यासाठी.
१३६. वरील गोष्टीत आलेल्या घंघाळ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
अ) जेवणाचे भांडे
ब) अंघोळीचे भांडे
क) उभट भांडे
ड) पसरट भांडे
खालील उतारा वाचून त्यावर विचारलेले प्रश्नांची उत्तरे लिहा
संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे झाला. आई-बाबांनी त्यांचे नाव ठेवले डेबू. गाडगेबाबांना स्वच्छता करणे, भजन, कीर्तन व उपदेश करणे खूप आवडायचे . महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल, की बाबांनी स्वतः राबून, कष्ट करून मदत करून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यांवर घाट बांधले. पाणपोया उघडल्या. गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा महाविद्यालय वसतिगृहे उभी केली. दुष्काळ पडला, लोकांन अनाथ झाले की बाबा तिथे हजर! त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा.
१३७.संत गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला?
अ) शेगाव
ब) शेणगाव
क) शेंडगाव
ड) शेवगाव
१३८.. संत गाडगेबाबांना काय आवडायचे ? अ)स्वच्छता करणे
ब) भजन व कीर्तन करणे
क) उपदेश करणे
ड) वरील सर्व पर्याय बरोबर
१३९.संत गाडगेबाबांची देवपूजा कोणती ?
अ) देवाची पूजा करणे
ब) तीर्थक्षेत्री जाऊन राहणे
क) रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणे
ड) यापैकी नाही
१४०.बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केली ?
अ) फक्त गरीब लोकांसाठी
ब) श्रीमंत लोकांसाठी
क) कीर्तन करणाऱ्यांसाठी
ड) गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी
१४१.खालील वाक्याच्या शेवटी आलेली विरामचिन्ह कोणते
अ) पूर्णविराम
क) उद्गारवाचक चिन्ह
ड) प्रश्नचिन्ह
दुष्काळ पडला, लोक अनाथ झाले की बाबा तिथे हजर!
ब) स्वल्पविराम
प्रश्न खालील संवाद वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेलिहा.
शाळेतून नेहमी हुंदडत खिदळत येणारा रामू रडवेल्या चेहऱ्याने घरी आलेला पाहून आईला आश्चर्य वाटलं. काळजीने तिने विचारलं,
“काय रे? काय झालं? तुझा चेहरा असा का उत्तरलाय?”
“इंग्रजीच्या गोडबोले मॅडमानी मला खडसावलं. “
“का पण?”
त्या म्हणतात, “विजय सारखं स्वच्छ अक्षर काढलं पाहिजे.”
“बरोबर आहे त्यांचं म्हणणं, तू अक्षर चांगलं का काढत नाहीस?”
१४२. रामूचा स्वभाव कसा होता?
अ) खोडकर
ब) लाजाळू
क) खेळकर
ड) शांत
१४३. संवाद कोठे घडला असावा?
अ) रस्त्यावर
ब) घरी
क) मैदानात
ड) शाळेत
१४४. रामूचे अक्षर कसे आहे?
अ) सुंदर
ब) स्पष्ट
क) चांगले
ड) अस्पष्ट
१४५. वरील उताऱ्यात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे? अ) तीन
ब) चार
क) निश्चित सांगता येत नाही
ड) दोन
१४६. गोडबोले मॅडम कोणता विषय शिकवत होत्या ?
अ) मराठी
ब) इंग्रजी
क) गणित
ड) विज्ञान
प्रश्न-खालील उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामवाडी येथे राहणारी पायल . सुट्टी निमित्त आई व तीचा भाऊ रोहन यांच्यासोबत ती मामाच्या गावी गेली . एके दिवशी ती कपडे धुण्यासाठी मामी बरोबर रोहनला सोबत घेवून नदीवर गेली. तिचा भाऊ रोहन काठावर खेळत असताना पाय घसरून नदीच्या पाण्यात पडला व लागला. मामी घाबरून गेली. पायलने प्रसंगावधान राखून धुण्यातील एक साडी घेतली. साडीचे एक टोक तिने पाण्यात सोडले. रोहनने ते टोक पकडले प्रियांकाने साडी हळूहळू ओढून रोहनचे प्राण वाचवले. प्रियांकाच्या धाडसाची दखल घेऊन तिला “बालशौर्य पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
१४७.पायलच्या गावचे नाव काय ?
अ) सिंधुदुर्ग
ब) रामवाडी
क) रजपूतवाडी
ड) रत्नागिरी
१४८. पायल सुट्टीला कुठे गेली होती ?
अ) मामाच्या गावी
ब) काकांकडे
क) भावाकडे
ड) आत्याकडे
१४९.- पायलच्या गाव कोणत्या जिल्ह्यात येते ?
अ) कोल्हापूर
ब) सांगली
क) रत्नागिरी
ड) सिंधुदुर्ग
१५० – पायलच्या भावाचे नाव काय ?
अ) सोहम
ब) रोहन
क) अतुल
ड) सूरज
१५१- पायलच्या धाडसाची दखल घेऊन कोणता पुरस्कार देण्यात आला ?
अ)बालमित्र पुरस्कार
ब)बाल शौर्य पुरस्कार
क) बालचमू पुरस्कार
ड) धाडसी पुरस्कार
प्रश्न – खालील जाहिरात वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
१५२. विद्यार्थी पाचवडे या शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्वात योग्य कारण कोणते?
अ) मोफत मध्यान्ह भोजन
ब) मोफत पाठ्यपुस्तके
क) मोठी इमारत
ड) गुणवत्तेची हमी
१५३. पाचवडे शाळेचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
अ) ई-लर्निंग
ब) वैयक्तिक मार्गदर्शन
क) विद्यार्थ्यांना राहण्याची सोय
ड) डिजिटल शाळा
१५४. वरील जाहिरात करण्याचे योग्य कारण कोणते?
अ) मोफत पाठ्यपुस्तक देणे.
ब) शासकीय गणवेश वाटप करणे
क) शाळेत प्रवेश वाढवणे.
प्राथमिक शाळा डिजिटल बनवणे.
१५५.विद्या मंदिर पाचवडे शाळेत कितवी पासून कितवी पर्यंत वर्ग आहेत?
अ) पहिली ते तिसरी
ब) पहिली ते सातवी
क) पहिली ते चौथी
ड) पहिली ते पाचवी
१५६. खालीलपैकी वरील जाहिरातीत न आलेली विद्यार्थी योजना कोणती ?
अ) शासकीय गणवेश योजना.
ब) राहण्याची सोय.
क मोफत प्रवेश.
ड) मोफत पाठ्यपुस्तके.
प्रश्न -खालील जाहिरात वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
१५७. प्रदर्शन कोठे भरवण्यात आले आहे?
(अ) सोलापूर
ब) कोल्हापूर
क) लातूर ड) बीड
१५८. कला कुसरीच्या वस्तू कोणी बनविल्या आहेत
अ) मोठ्यांनी
ब) छोट्यांनी
क) तरुणांनी
ड) विद्यार्थ्यांनी
१५९. प्रदर्शन किती दिवस भरवण्यात येणार आहे?
अ) चार दिवस
ब) तीन दिवस
क) पाच दिवस
ड) दोन दिवस
१६०. प्रदर्शनात खालीलपैकी कोणती गोष्ट पहावयास मिळणार नाही?
अ) चित्रकलाकृती
ब) सुंदर मेणबत्त्या
क) कागद कलाकृती
ड) प्लास्टिकची खेळणी
१६१. -प्रदर्शनाची वेळ कोणती?
अ) सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत ब) सकाळी ९ तेरात्री ८ पर्यंत
क) सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत
(ड) सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत
प्रश्न- खालील बातमी वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थ्यांनी पत्रलेखननातून केले आई-बाबांना मतदानाचे आवाहन
कोल्हापूर दिनांक : 26 ऑक्टोबर 2024
आई बाबा मतदान करणे आपले राजकीय कर्तव्य आहे तुम्ही पण मतदान करून कर्तव्य पार पाडा असे पत्र विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना लिहून मतदान करण्याची भावनिक साद दिली. कोल्हापूर प्रशासनाच्या वतीने पत्र लेखनाच्या या उपक्रमात अडीच लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यातून मतदान करण्याचा भावनिक संदेश आई-वडिलांपर्यंत पोहोचून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल असे प्रशासनाचे असे प्रशासनाने म्हटले आहे प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वांनी अभिनंदन केले.
१६२. वरील बातमी कोणत्या तारखेला प्रसिद्ध झाली असावी?
अ) २५ ऑक्टोंबर
ब) २६ ऑक्टोंबर
क) २७ ऑक्टोंबर
ड) २६ सप्टेंबर
१६३. विद्यार्थ्यांनी कोणास पत्रे लिहिली आहेत ?
अ) मित्रांना
ब) नातेवाईकांना
क) बहिणीला
ड) आई – बाबांना
१६४.विद्यार्थ्यांनी पत्रातून आई- वडिलांना कशाचे आवाहन केले आहे ?
अ)निवडणूक लढवण्याचे
ब) मतदान न करण्याचे
क) मतदान करण्याचे
ड) मतदाना दिवशी गावाला जाण्याचे १६५. पत्रलेखनाचा उपक्रम कोणी राबवला ?
अ)संस्था प्रशासन
ब) बचत गटांनी
क) गावचे प्रशासन
ड)कोल्हापूर प्रशासन
१६६.अभिनंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही?
अ) कौतुक करणे
ब) शाब्बासकी देणे
क) पाठ थोपटणे
ड) नवल वाटणे
प्रश्न- खालील बातमी वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
फटाके मुक्त दिवाळीचे आवाहन
सिन्नर -वार्ताहर दि २२ ऑक्टोंबर २०२४
फटाक्यामुळे ध्वनी, हवा, व पाणी यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या वर्षाची दिवाळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहू शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून फटाके ऐवजी पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. मोहू शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या आव्हानाला अनेकांनी दाद दिली आहे.
१६७. ही बातमी कोणत्या आशयाची आहे ?
अ) प्रदुषणमय दिवाळी
ब) फटाकेमुक्त दिवाळी
क) वाचाल तर वाचाल
ड) प्रदूषण
१६८.विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन का केले आहे ?
अ) फक्त हवा प्रदूषण टाळावे म्हणून
ब) दिवाळी चांगली व्हावी म्हणून.
क) पर्यावरणाच्या संवर्धनासाठी.
(ड) फटाक्यांचे पैसे जमवावे म्हणून.
१६९.फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन कोणी केले आहे ?
अ) पालकांनी
ब) शिक्षकांनी
क) समाजाने
ड) विद्यार्थ्यांनी
१७०.वरील बातमीत प्रदूषणाच्या किती प्रकारांचा उल्लेख आला आहे ?
अ) २
ब) ३
क) ४
ड) १
१७१.विद्यार्थ्यांनी फटाके ऐवजी काय खरेदी करण्याचे आवाहन केले आहे ?
अ) वहया
ब) कपडे
क) पुस्तके
ड) पेन्सिली
प्रश्न-खालील सूचना वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा
सूचना
दि. २८ ऑक्टोंबर २०२३
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की बाल दिनानिमित्त
आपल्या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठीवक्तृत्व ,निबंध,चित्रकला, कथा वाचन स्पर्धा होणार आहेत तरी सर्व मुलांनी आपापली नावे आपल्या वर्ग शिक्षकांकडे द्यावीत. स्पर्धा सहभाग प्रमाणपत्राचे
वाटप केले जाणार आहे.
मुख्याध्यापक
१७२.शाळेत कशाने निमित्त स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत ?
अ) वाढदिवसानिमित्त
ब) बालदिनानिमित्त
क) शिक्षण सप्ताह निमित्त
ड) मतदान जनजागृती अभियानानिमित्त
१७३. बालदिनानिमित्त खालीलपैकी कोणत्या प्रकारची स्पर्धा घेण्यात येणार नाही?
अ) चित्रकल स्पर्धा
ब)वक्तृत्व स्पर्धा
क) निबंध स्पर्धा
ड) गायन स्पर्धा
१७४.शाळेत आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये खालीलपैकी कोणत्या इयत्तेचे विद्यार्थी सहभागी होणार नाहीत ?
अ) ४थी
ब) ७वी
क) ८वी
ड) १ली
१७५.कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाचे वाटप केले जाणार आहे ?
अ) वह्यांचे
ब) पुस्तकांचे
क) कपडयांचे
ड) प्रमाणपत्रांचे
१७६. वरील सूचना कोणी दिली आहे ?
अ) शिक्षकांनी
ब) सरपंचांनी
क) मुख्याध्यापकांनी
(ड) अध्यक्षांनी
प्रश्न-खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे ओळखून योग्य पर्यायाला गोल कर
जय भारता ! जय भारता !
जय भारती जन देवता !
जय लोकनायक थोर ते
जय क्रांतीकारक वीर ते
जय भक्त ते रणवीर ते
जय आमुची स्वाधिनता
जय भारता ! जय भारता !
तेजोनिधी तो भास्करा,
प्रिय पर्वता प्रिय सागरा,
तरू वृदहो, हे अंबरा,
परते पहा परतंत्रता
जय भारता ! जय भारता !
योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाला गोल कर.
१७७. : कवीने ही कविता का लिहीली असावी ?
अ) स्वातंत्र्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी
ब) आनंद मिळविण्यासाठी
क) क्रांतिकारक बनण्यासाठी
ड) वीरांना वंदन करण्यासाठी
१७८ : तरूवृंद हो अंबरा’ ह्या ओवीचा अर्थ सांग. अ) तरुणाची आकाशाकडे झेप घेणे.
ब ) उंच उंच झाडाची आकाशाकडे धाव घेणे.
क) अंबराला गवसणी घालणे.
ड) आकाश कवेत घेणे.
१७९ : “सूर्य” या शब्दासाठी समानार्थी आलेला शब्द शोध
अ) अंबरा
ब) भास्करा
(क) रणवीर
(ड) देवता
१८० : कवितेत्त “वीर” कोणाला म्हटले आहे ?
अ) रणवीर
ब) लोकनायक
क) क्रांतिकारक
(ड) भार
१८१: या कवितेतील “परतंत्रता ” या शब्दाचा अर्थ काय आहे ?
अ) स्वातंत्र्य
ब) मोकळीक
क) परतंत्र
ड) स्वतंत्रता
वैष्णावी मंगेश खराटे
जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा म्हैसांग
र्वग6वा
सर्व प्रश्न सोडवून खूप छान वाटले अस प्रश्न संच नेहमी मिळाला तर मुलं खूप हुशार आणि स्वतः वचून स्वतः हा त्या प्रश्नांची उत्तरे सोडवायला सक्षम होतील.
Hi
Very nice sir