विभक्ती : 1
मुलांनो, तुम्ही प्रत्येकजण आपल्याला घरात राहता. तिथे आई, वडील, भाऊ, बहिण अशी तुमच्या नात्याची मंडळी एकत्र राहतात. या सर्वांना मिळून आपण ‘कुटुंब’ म्हणतो. प्रत्येक कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते व त्या घरात राहणारी जी इतर माणसे असतात, त्यांचा त्या प्रमुख व्यक्तीशी लांबचा अगर जवळचा संबंध असतो. अशी एकमेकांशी संबंध असलेली मंडळीच कुटुंबात राहतात.
आपल्या बोलण्यात अनेक वाक्ये येतात. त्यातील प्रत्येक वाक्य हे एक प्रकारचे कुटुंबच होय. वाक्य हे शब्दांचे बनलेले असते; म्हणून वाक्यरूपी कुटुंबातील ‘शब्द’ ही माणसे होत. या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजे ‘क्रियापद’. वाक्यातील इतर शब्दांचा या कुटुंबप्रमुखाशी म्हणजे क्रियापदाशी जवळचा किंवा असतोच. कसा ते पाहू :
दूरचा संबंध
‘बाबांनी मला सायंकाळी बागेत फिरायला नेले.’ हे एक वाक्य आहे. या वाक्यरूपी कुटुंबातील प्रमुख क्रियापद ‘नेले’: म्हणून या वाक्यातील ‘नेले’ हा कुटुंबप्रमुख! याचा वाक्यातील इतर शब्दांशी कसा संबंध आहे,
तो पाहा :
कोणी ? – बाबांनी
कोणाला ? – मला
नेले केव्हा ? _ सायंकाळी
कोठे ? – बागेत
कशासाठी ? –फिरायला
घरात कुटुंबप्रमुखाशी जी नाती असतात, त्यांतील भाऊ, बहिण, आई, वडील, मुलगा, मुलगी ही प्रत्यक्ष नाती होत; पण कुटुंबात भावाची बायको (भावजय), आईची बहिण (मावशी), वडिलांची बहिण (आत्या) अशा तऱ्हेची मंडळी असतात. कुटुंबप्रमुखाशी त्यांचे प्रत्यक्ष नाते नसले, तरी अप्रत्यक्ष नाते असते. हीच गोष्ट वाक्यातही पाहायला मिळते. वाक्यातील प्रत्येक शब्दाचा क्रियापदाशी प्रत्यक्ष संबंध असेलच असे नाही काहींचा दुसऱ्या शब्दांशी संबंध असतो व त्या शब्दांचा क्रियापदाशी संबंध असतो.
उदाहरणार्थ : माझी आई शेजारच्या काकूंना वारंवार पैशाची मदत करते.
या वाक्यातील प्रमुख शब्द म्हणजे ‘करते’ हे क्रियापद. या वाक्यातील प्रत्येक शब्दाचा ‘करते’ या क्रियापदाशी कसा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे, पाहा :
यातील ‘आई, काकूंना, वारंवार व मदत’ या चार शब्दांचा ‘करते’ या क्रियापदाशी प्रत्यक्ष संबंध आहे. ‘माझी, शेजारच्या व पैशाची’ यातीन शब्दांचा संबंध अनुक्रमे आई, काकू व मदत यांच्याशी आहे व या शब्दांचा संबंध क्रियापदाशी आहे; म्हणून या तीन शब्दांचा क्रियापदाशी अप्रत्यक्ष संबंध आहे.
अशा रीतीने वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो. याला ‘कारक’ असे म्हणतात.
विभक्ती : वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. याचा अर्थ नुसते शब्द एकापुढे एक गेले म्हणजे वाक्य तयार होत नसते जसे: बाबा मी सायंकाळ बाग फिरणे नेणे.
असे नुसते शब्द एकापुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही. वाक्याचा बोध व्हावा व शब्दांचा संबंध जुळावा म्हणून या शब्दांच्या रूपांत आपण थोडा बदल करतो.
जसे :
बाबा. बाबांनी
मी. मला
सायंकाळ. सायंकाळी
बाग. फिरणे
नेणे. बागेत
फिरायला. नेले.
वरील शब्दांचे वाक्य तयार व्हायला यांतील प्रत्येक शब्दाच्या रूपात बदल झाला असल्याचे दिसून येईल. वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवण्यासाठी नामांच्या व सर्वनामांच्या
रूपांत हा जो बदल होतो, त्या बदलाला ‘विभक्ती’ असे म्हणतात.
‘बाबा’ या मूळ शब्दाला ‘नी’ हे अक्षर जोडून ‘बाबांनी’ असा शब्द तयार केला. ‘मी’ या मूळ शब्दाला
‘ला’ हे अक्षर जोडले व ‘मला’ असे रूप झाले. ‘सायंकाळ’ या शब्दाला ‘ई’ हे अक्षर जोडून ‘सायंकाळी’ असे रूप तयार केले. ‘बाग’ या शब्दाला ‘त’ हे अक्षर जोडले व ‘बागेत’ असे रूप केले.
नामांना किंवा सर्वनामांना जोडलेल्या अशा प्रकारच्या अक्षरांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात. हे प्रत्यय म्हणजे शब्दांना एकमेंकांशी जोडणाऱ्या कड्याच आहेत. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करताना त्यांना जी अक्षरे जोडतात त्यांना ‘विभक्तीप्रत्यय’ असे म्हणतात.
‘नी, ला ई, त, स, ना, ची’ हे विभक्तीचे प्रत्यय होत.
विभक्ती : 2
वाक्यात येणाऱ्या नामांचा व सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो, हे आपण अभ्यासले. आता हा संबंध किती प्रकारचा असतो, हे पाहू.
वाक्यात क्रियापद हा क्रिया दाखवणारा प्रमुख शब्द होय. मग ही क्रिया करणारा कोणीतरी त्या वाक्यात असलाच पाहिजे. यालाच आपण कर्ता म्हणतो. क्रिया म्हटली म्हणजे ती कोणावर तरी घडणार, त्यास आपण कर्म म्हणतो. याशिवाय ती क्रिया कोणत्या साधनाने केली? ती कोणत्या हेतूने किंवा कोणासाठी केली ? ती क्रिया कोठपासून घडली? ती कोठे किंवा केव्हा घडली? हे सांगणारे शब्द वाक्यात येत असतात. क्रियापदाशी असे नाते असणाऱ्या शब्दांचे आठ गट पाडण्यात आले आहेत. या आठ गटांची वेगवेगळी कामे मानतात. हे आठ गट म्हणजेच विभक्तीचे आठ प्रकार. त्यांना पहिला, दुसरा, तिसरा अशा अर्थाची संस्कृतातली आठ नावे आहेत. ती नावे अशी :
1) प्रथमा 2) द्वितीया 3) तृतीया 4) चतुर्थी 5) पंचमी 6) षष्ठी 7) सप्तमी 8) संबोधन
आठव्या विभक्तीला अष्टमी असे न म्हणता तिला ‘संबोधन’ असे नाव दिले आहे. संबोधन म्हणजे हाक मारणे. ‘रामा, इकडे ये’. या वाक्यात ‘रामा’ या शब्दाने आपण हाक मारली. येथे ‘रामा’ची विभक्ती ‘संबोधन’ होय. वाक्यातील शब्दांचा परस्परांशी येणारा संबंध विभक्तीच्या प्रत्ययाने दाखवला जातो. हे विभक्तीचे प्रत्यय कोणते ते प्रत्येक विभक्तीच्या पुढे तक्त्यात दिले आहेत. तसेच, नामाला हे प्रत्यय लागताना नामाची कोणकोणती रूपे होतात, तेही तुम्हांला तक्त्यात पाहावयास मिळेल.
विभक्तींचे प्रत्यय व ‘गाव’ या नामाची होणारी रूपे :
वरील नामाबद्दल सर्वनामे येतात. विभक्तीचे हे प्रत्यय सर्वनामांनाही लागून त्यांची निरनिराळी रूपे होतात ही रूपे कशी होतात, हे खालील तक्त्यात वाचा. सर्वनामाला हाक मारावी लागत नाही; म्हणून सर्वनामाला संबोधन ही विभक्ती नसते .
मी या सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लागून होणारे रुपे:
याचप्रमाणे तो, हा, जो, कोण यांनाही वरील विभक्तीचे प्रत्यय लागून त्यांची रूपे तयार होतात. आपल्याला विभक्तीचे प्रत्यय माहीत झाले आहेत. एखाद्या नामाची किंवा सर्वनामाची विभक्ती त्याच्या प्रत्ययावरून ओळखणे सोपे असते. ती कशी ओळखावी हे पुढील तक्त्यातील उदाहरणावरून पहा.
प्रत्ययावरून विभक्ती कशी ओळखावी?
विभक्तीचे कारकार्थ चे प्रकार पुढीलप्रमाणे :-
कर्ता :- क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो त्याला कर्ता असे म्हणतात. कर्त्यांची प्रथमा विभक्ती असते म्हणून प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.
उदा. आदित्य ज्यूस पितो.
कर्म : कर्त्याने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म‘ होय. कर्माची द्वितीया असते, म्हणून द्वितीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो.
उदा. राकेश काम करतो.
करण :-वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते किंवा ज्याच्या साधनाने घडते त्याला करण असे म्हणतात. ‘करण‘ म्हणजे साधन. मी सुरीने सफरचंद कापले या वाक्यात कापण्याची क्रिया सुरी या साधनाने केली म्हणून सुरीने या शब्दाची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे.
उदा. महेश चाकूने कांदा कापतो.
संप्रदान:-
जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे इत्यादी अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला वा स्थानाला संप्रदान असे म्हणतात, जेंव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेंव्हा ते दान ज्याला करण्यात येते ‘मी गुरुजीना दक्षिणा दिली‘ या वाक्यात गुरुजीना याची विभक्ती
चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे..
उदा. गणेश महेशला पुस्तक देतो.
महेशला ही चतुर्थी विभक्ती आहे म्हणून चतुर्थीचा प्रमुख कारकार्थ संप्रदान असतो.
अपादान :-
क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एख्याद्या वस्तूचा वियोग
दाखवावयाचा असतो त्यास अपादान असे म्हणतात.
उदा – मी शाळेतून आताच घरी आलो या वाक्यातील शाळेतून या शब्दाची विभक्ती पंचमी व पंचमीच्या मुख्य कारकार्थ अपादान आहे.
राजू घरातून बाहेर आला.
घरातून या शब्दाची विभक्ती पंचमी आहे. म्हणून पंचमीचा प्रमुख
कारकार्थ अपादान असतो.
अधिकरण :- वाक्यातील क्रिया कोठे घडली किंवा केंव्हा घडली हे सांगणाऱ्या म्हणजेच क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणा-या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात.
उदा– रोज दुपारी राजेश दुकानात जातो. दुपारी आणि दुकानात हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व दुकानात हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे.
उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.
या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व
स्थल दाखवितात त्यांची विभक्ती सप्तमी व सप्तमीचा
अधिकरण आहे. ( अधिकरण – आश्रय, स्थान )
संबोधन.
संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते त्याला विकार होतो व प्रत्ययही लागतात म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती मानतात.
विभक्ती ही कारकार्थवरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी.