Mazi Marathi | Nibandh in Marathi | माझी मराठी निबंध |

माझी मराठी

          प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो ,तसा मलाही आहे. माझी भाषा, माझी मायबोली ‘माझी मराठी ‘आहे .मातृभाषा, मायबोली अशा अनेक नावांनी आपण बोलत असणाऱ्या भाषेला संबोधले जाते. 

      ‘मराठी भाषा ‘काय सांगावी तिची महानता? संपन्न, समृद्ध, सुमधुर अशी माझी ‘मराठी भाषा’! तिची परंपरा आणि वृद्धी अवस्था खूपच मोठी आहे, तिच्या महानतेचे वर्णन करताना शब्द कमी पडतील असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही . लहानपणापासून ‘मराठी भाषा’ वाचली, शिकली, बोलली, लिहिली ,अभ्यासली ,अनुभवली!.  तशी तिची गोडी, तिची रसिकता, तिची परिपूर्णता वाढतच गेली आणि वाढतच गेली….. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, “माझी मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके”खरंच आहे ते मराठी भाषेची रसाळता, मधुरता, गोडवा अप्रतिम आहे.

           मराठी भाषेचा इतिहास पाहता साधारणपणे १५०० वर्षांपूर्वीपासून ‘मराठी भाषा’ अस्तित्वात आहे. ‘मराठी भाषा’ मूळ आर्यांची भाषा आहे. शके अकराशे मधील मुकुंदराजांनी रचलेला ‘विवेक सिंधू’ हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे.’भगवद्गीता’ सर्वसामान्यांना समजावी यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ वा ‘भावार्थदीपिका’ या ग्रंथाचे लेखन मराठी भाषेत केले. श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेला ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला ‘मराठी पद्य चरित्र ग्रंथ’ आहे .मराठीच्या उगमापासून सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या सर्व बदलांचे मुख्य कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल्या निरनिराळ्या सत्ता होय.         

   लाभले आम्हास भाग्य ,बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी

धर्म ,पंथ ,जात एक, जाणतो मराठी

एवढ्या जगात माय ,मानतो मराठी

             ‘मराठी भाषा’ ही माझी मायबोली असल्याचा मला खूप अभिमान आहे. हे वरील काव्यपंक्तीतून दिसते. मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला .याबाबत सर्व भाषा तज्ञांचे एक मत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण ‘मराठी भाषेची जननी’ म्हणून ओळखली जाते. मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्रीय बोली भाषेतून झाला ,असे बहुतांशी मानले जाते.

       पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्रीय भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला.देवनागरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. 

मराठी भाषा काय सांगावी तिची महानता? संपन्न, समृद्ध, सुमधुर अशी ‘माझी मराठी’! तिची परंपरा आणि वृद्धी अवस्था खूपच मोठी आहे. तिच्या महानतेचे वर्णन करताना शब्द कमी पडतील असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. जुन्याची आणि नव्याची साथ बरोबर घेऊन ‘मराठी’ चालते त्यामुळेच नभीची चंद्रकोर म्हणून ती सतत वाढत आहे, चमकत आहे.

        ‘मराठी’चा ठेवा खूपच मौल्यवान आहे.तिची समृद्धता अनुभवायला खूपच मोठी रसिकता गरजेची आहे. मराठीची समृद्धता, शब्दसंपत्ती खूपच समृद्ध आहे. स्वतः बरोबरच दुसऱ्या भाषेतील ही अनेक शब्द तिने आपलेसे केले आहेत, मात्र आपले  स्वतःचे अस्तित्व  ही तिने आजवर अबाधीत राखले आहे. दुसऱ्यांना सामावून घेऊनही आपली जागा अबाधित राखणे  जमलंय माझ्या मराठीला! म्हणजेच दुसऱ्याचाही आदर करण,  त्यांचं अस्तित्व मान्य करणे, चांगल्याचा स्वीकार करणं ‘मराठी’कडूनच शिकल्यासारखं वाटलंय इतकं एकरूप होणं जमलय आम्हाला मराठीमूळेच!

      ‘माझी मराठी’ अतिशय गोड आणि श्रवणीय आहे. आनंद आहे तिच्या श्रवणात आणि बोलण्यातही मराठी भाषेचा झेंडा फक्त महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाने झळकत आहे आणि सतत झळकणार आहे .याचे कारण मराठी भाषेची समृद्धता, साधेपणा आणि प्रगल्भता आहे असे म्हणता येईल.

          मराठीचं सौदर्य, तिची थोरवी एका छोट्याशा स्वरचित काव्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केलाय…      अवीट बोली मराठी

मज असे वंदनीय 

तिचा साज अनोखाच

असे सदा श्रवणीय ||१||

भव्य मराठी भांडार 

असे रसिकास वरदान 

अनुभवास तिज 

लाभू दे सकला भान ||२||  

ओवी, अभंग, भारुड 

असे तिची बोली गोड 

प्रबोधनाची पताका 

नाही तिला कुठे तोड ||३|| 

माझा आभिमान असे 

माझी मायबोली थोर 

जगतास लाभलेली 

नभीची ती चंद्रकोर ।।४।। 

तिचा साज अनोखाच 

मनीचा  हाटे अंधार 

भेटता तिचा आधार 

कळेल शब्दांची धार ||५||

अशी समृद्ध मराठी माझी मायबोली असल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याबरोबरच तिचे संवर्धन आणि जपवणूक करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. आपली संपत्ती जपण्याचे मोठे काम आपल्या सर्वांवर आहे.’जितकी श्रीमंती जास्त तितकी जबाबदारी जास्त’असे जुने लोक म्हणायचे ,त्याप्रमाणे आपण इतक्या समृद्ध, संपन्न, सुंदर मराठी भाषेचे वारस आहोत याचा अभिमान असतानाच तिला वाढविण्याची जबाबदारी आपण पेलली पाहिजे.

         ‘बारा कोसावर भाषा बदलते’ असे म्हटले जाते.  तशीच ‘माझी मराठी’ विविध ढंगात, लकबीत बोलली जाते. सोलापुरी , नगरी, वराडी, कोल्हापूरी, पुणेरी अशा तिच्या अनेक लकबी! बोलण्याच्या लकबीवरून किंवा विशिष्ट शब्दरचनेवरून माणूस महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातला? हे आपण बरोबर ओळखू शकतो.लका, लई, व्हयं, इढं असे अनेक शब्द आहेत जे विशिष्ट भागात वापरले जातात. या विशिष्ट पद्धतीने निर्माण होते नवीन लकबीची मराठी भाषा! अशी कलात्मक भाषा आपल्या बोलण्यातून आपण जपली पाहिजे. ‘माउथ पब्लिसिटी’ हा परवलीचा शब्द आजकाल त्यासाठी वापरला जातो तो वापरून आपण आपल्या मराठीचा प्रचार आणि प्रसार करू या!

          महात्मा गांधीजी आणि अनेक शिक्षणतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, प्राथामिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे,खरे आहे ते !आकलन चांगले होण्यासाठी,अभिव्यक्त होण्यासाठी मातृभाषे इतके प्रभावी माध्यम नाही. मराठी माध्यमाच्या शाळेत जास्तीत जास्त मुलांचा प्रवेश करून निदान प्राथामिक शिक्षण तरी मातृभाषेतून म्हणजे मराठीतूनच देऊन नवीन पिढीला आपण मराठीची समृद्ध ओळख करून देऊ शकतो. मराठी ज्ञानाचा अथांग  सागर आपण त्याना दाखवून देऊ शकतो आणि त्याबरोबरच अभिरूची वृद्धिंगत  करण्यात मदत करू शकतो. मराठी भाषा संवर्धनासाठी आपणही ‘मराठी शाळांचा आग्रह’ही भूमिका प्रभावी ठरू शकते.

          मराठी भाषेतील साहित्यपरंपरेचा अभ्यास केला किंवा विचार जरी केला तरी मराठी भाषेच्या समृद्धतेची कल्पना येते. अनेक श्लोक, ओव्या, भारुडे, कीर्तन, प्रवचने, ग्रंथ असा आध्यात्मिक वारसा आहे आपल्या मराठीला! आध्यात्माबरोबरच प्रबोधनाची पताकाही आपल्या संतांनी राखली आहे, आपल्या लेखनात! या सर्वांचे वाचन करताना, अभ्यास करताना मन आनंदी होते,अगदी आनंदून जाते. मराठीच्या या अथांग रससागरात डुंबायला पुन्हा पुन्हा मन उतावीळ होते. अध्यात्माबरोबरच ज्ञान, विज्ञान, प्रबोधन अशी तिरंगी पताका मराठी भाषेच्या मुकुटात एक मानाचा तूरा म्हणून कायम झळकत आहे. आपली भूमिका किंवा कर्तव्य एवढेच आहे की आपण हा वारसा पुढच्या पिढीला दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपण हा वारसा अनुभवायला हवा तरच आपण तो  पुढच्या पिढीला देऊ शकतो. मराठीच्या संवर्धनासाठी तिचा वारसा वाचून, लिहून, सांगून अशा अनेक प्रकारांनी आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो.

              नाटक, काव्य, कथा,कादंबरी,एकांकिका, प्रवासवर्णने आत्मचरित्र असं ओतप्रोत भरलेलं साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे. त्यातही पौराणिक,आध्यात्मिक, आधुनिक, विनोदी, रहस्यमय, भावनिक अशा रसांनीयुक्त साहित्य आहे. प्रत्येक रसिकाची साहित्यिक भूक भागविण्याची क्षमता मराठीत आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच राहणार आहे.साहित्यातील नवरसाचा ओतप्रोत भरलेला खजाना मराठीत आहे. मराठीची साहित्यपरंपरा खूप जुनी आहे. पु.ल.देशपांडे, शंकरराव खरात, ग.दि.माडगुळकर यांचे पासून, ना .धों. महानोर, गुरू ठाकुर, बालकवी, शांता शेळके, अनिल अवचट, गोविंदाग्रज किती किती नावे आठवावित! एखादया रसिकाची साहित्यिक भूक भागविण्याची क्षमता माझ्या मराठीत शिगोशिग भरलीआहे!या सर्व साहित्यिकपरंपरेचा ठेवा आपण स्वतः अभ्यासला पाहिजे. किमान आपल्या आवडीचे जे काही मराठी साहित्य आहे त्याला आपण आपल्या मित्रपरिवारात वाटले पाहिजे, पोहचविले पाहिजे. आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात मराठी संवर्धनासाठी आपण सोशल मीडिया, इंटरनेट या माध्यमांना हाताशी धरून मराठी पुढे नेली पाहिजे, ती वृदधिंगत केली पाहिजे.

         मराठी भाषेचे लेखन ‘देवनागरी लिपीत’ करतात. त्याला तर कुठे तोडच नाही! अगदी जणू मोती पडावेत असे मराठीतील एकएक अक्षर वळणदार आणि सुबक आहे. ओतप्रोत असणारी माझी मराठी, अक्षरांना तिला दिल्या जाणा-या मात्रांनी नटलेली आहे, सजलेली आहे. काना, वेलांटी, ऊकार , मात्रा, अनुस्वार या प्रत्येकाची एक वेगळीच ऐट आहे, डौल आहे. या सर्वामुळे ‘माझी मराठी’ आधिकच डौलदार, ऐटदार दिसते.

        मराठीचे लेखन पाहिले की तिचे वेगळेपण डोळ्यात सामावते, मनाला खूप भावते. प्रत्येक अक्षराला त्याचे वळण आहे अक्षर कसे काढावे? म्हणजे कुठून सुरू करावे? कोठे थांबवावे याचे एक शास्त्र आहे, पद्धत आहे. या पद्धतीने गेल्यास आपल्याला मोत्यासारखे अक्षर काढणे जमलेच म्हणून समजा. मराठीचे लेखन आपण दैनंदिन जीवनात करून मराठी भाषेचे संवर्धन करू शकतो. अगदी छोट्या छोट्या यादयांपासून , अर्ज, लेख, फलक, भित्तिचित्र अशा सार्वजनिक तसेच वैयक्तिक जीवनात लेखनासाठी प्रमाणबद्ध मराठीचा वापर करून आपण मराठीचे जतन आणि संवर्धन करू शकतो. एकंदरच काय तर आपण मराठी वाचनाची, बोलण्याची, लिहिण्याची सवय  अंगी बाणली पाहिजे. आपल्या मराठीच्या संवर्धनासाठी मराठी लेखन बघताना सहजच सूचलेली कल्पना येथे मांडावी वाटते ‘अशी नटली अक्षरांनी, जशी सुंदर ललना मनाला भावली तिची ही सुबक रचना’. लेखनात वापरले जाणारी विरामचिन्हे भाषेला अतिशय अर्थपूर्ण आणि सुवाच्य बनवतात. ‘विरामचिन्हे’ भाषेला एका वेगळ्याच ,अनोख्या टप्प्यावर नेऊन ठेवतात.विरामचिन्हांच्या वापरामुळे भाषेचे सौंदर्य खुलते तसेच तिचा अर्थही निश्चित होतो. इतके महत्त्व आहे भाषेत विरामचिन्हांना! प्रत्येक विरामचिन्हाची भूमिका, आकार वेगवेगळा आहे. त्यांचा वापर करून कधी कधी भाषेचा रुबाब वाढविता येतो तर कधी कधी यांचा वापर जाणुनबुजून वेगळ्या ठिकाणी करुन विनोद निर्मिती सुद्धा करता येते.

मराठी भाषेत वापरत असणारी विरामचिन्हे आपण मराठीचे लेखन करताना वापरली पाहिजेत त्याचा उपयोग करून भाषेचे सौंदर्य, अर्थगर्भिता वाढवली पाहिजे. लेखन करताना अक्षरांचे वळण, विरामचिन्हांचा वापर या सर्वाचा वापर प्रकर्षाने केला पाहिजे. नियमबद्ध आणि प्रमाणबद्ध लेखनाने मराठी भाषेच्या संवर्धनाना आपण मदतच करणार आहोत.

         माझी मराठी खूपच थोर आहे. तिची ऐट मिरवताना ऊर भरून येतो. परदेशात राहणारे महाराष्ट्रीयन परदेशात सुद्धा आपली ‘मराठी संस्कृती’ जपताना दिसताना एकूणच आनंदाबरोबरच मराठी भाषेचा प्रसारच ते परदेशात करतात. परदेशात होणारे मराठी नाटकांचे प्रयोग, गीताचे कार्यक्रम, प्रदर्शित होणारे चित्रपट आपल्याला मराठी कुठेकुठे मानाने मिरवते याचेच दर्शन होते. भाषेची समृद्धता तिला संपूर्ण जगात, जगाच्या कानाकोप-यात मानाने घेउन जाते. आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांनी आपली एक जागा निर्माण केली आहे. अनेक  महोत्सवात, वेगवेगळ्या विभागात मराठी भाषेतील चित्रपट पूरस्कार मिळवतात, त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर! ही एक मराठीची सेवाच नाही का ?’मराठी भाषा’ संवर्धनासाठी ही पण एक परिक्रमाच नाही का?

        मराठी समृद्ध आहेच परंतु तिची समृद्धता वाढविण्यासाठी, टिकविण्यासाठी, समृद्धतेचा वारसा पुढेपुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.’महाराष्ट्र शासन’ सतत प्रयत्नशील आहे.वेगवेगळे महोत्सव, मराठी भाषेचे वेगवेगळे दिन साजरे करून आपण मराठीला समृद्ध करण्याचा प्रयत्न करतोय.१९६० साली मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळाला. नवनवीन  साहित्यिकांनी ,कवी, कवयित्रींनी मराठी भाषेचे भांडार अजून समृद्ध करण्यासाठी सतत लेखन करत राहिले पाहिजे. मराठी भाषेच्या मुकुटात एक एक मानाचा तुरा सतत खोचत राहिले पाहिजे.मराठी साहित्यात संशोधन करायला खूप वाव आहे .ते संशोधन करून  स्वतःचे ज्ञान वाढवून ते जगासमोर आणावे . आपली मराठी म्हणजे कशी ज्ञानाची खाण आहे हे जगाला दाखवून द्यावे.

       महाराष्ट्र शासनातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित केला जातो. यामध्ये ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . मराठी भाषेचे अनेक पैलू जगासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे . मराठी भाषेची महती, प्रगल्भता सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन  आयोजकां मार्फत केले जाते.मराठी कथा, कविता कादंबऱ्या सध्या आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने ऐकता येतात. एक नवीनच पाऊल मराठीच्या जगात टाकता आले आहे. नवीन तंत्रज्ञान ,नवीन कल्पना स्वीकारून मराठी चालली आहे.नवनवीन स्वीकारायचं आणि  पुढे चालत जायचं यामुळे ‘आपली मराठी भाषा’ आजही मानाने मिरवत आहे .मराठीचा झेंडा सतत लहरत आहे.                                                    जुन्या आणि नव्या ची साथ बरोबर घेऊन. मराठी चालत आहे. आपणा सर्वांची हीच जबाबदारी आहे की, आपल्याला तिचं रूप, तिचं सौंदर्य , तिचा बाणेदारपणा, तिचा रुबाब, तिची बालिशता जपायचीय. कितीही विशेषणे वापरली तरी ती कमीच पडतील, मराठीसाठी!

लेखिका

स्वाती माणिक कावरेMA B.Ed , M.Ed.Phd ,SET

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!